पुणे : बसथांब्यांवर वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या एका तासात अटक केले. यात सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी असे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसथांब्यांवर महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट एकने दोन स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही चित्रीकरण व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, निगडी बसथांबा परिसरात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून पळणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाखांचे मंगळसूत्र व गंठण हस्तगत केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याचवेळी दिघी परिसरात घरफोडी करणाऱ्या एका संशयितासह चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली. त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून दिघी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघड करण्यात आले. तिसऱ्या कारवाईत, दुचाकी चोरी करणाऱ्या विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दीड लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.






