नागपूर : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात आज विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा इथं होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमी नागरिकांच्या सोयीसाठी महामेट्रो तर्फे मेट्रो ट्रेन सेवा रात्री १० वाजेनंतरही सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत तसंच आवश्यक असल्यास त्याही पुढं सुरु ठेवण्यासंबंधीचा निर्णय महा मेट्रो प्रशासनानं घेतला आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस यांच्यात संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सामन्याच्या दिवशी प्रवाशांचा सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी खापरी मेट्रो स्टेशन ते जामठा स्टेडियम मार्गावर नागपूर महानगरपालिकेच्या बसेस फिडर सेवा म्हणून उपलब्ध असतील. यामुळं रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आज शेवटची मेट्रो ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरुन मध्यरात्री १२ वाजता सुटेल. तसंच क्रिकेटप्रेमींच्या गरजेप्रमाणे मेट्रो सेवा त्यानंतर देखील सुरु राहील. प्रवासी खापरी येथून ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत थेट प्रवास करु शकतील किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून एक्वा लाईनवरील कोणत्याही दिशेने प्रवास करू शकतील. मेट्रो गाड्या दर १० मिनिटांच्या अंतरानं धावणार आहेत. व्हीसीए जामठा स्टेडियम हे न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किमी आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किमी अंतरावर आहे. स्टेडियमकडे जाण्यासाठी तसंच सामन्यानंतर परतीसाठी न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरुन मनपाच्या बसेस (शुल्क आकारुन) उपलब्ध असतील. मॅचनंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित व जलद प्रवासासाठी नागरिकांनी महा मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आलं आहे.






