नाशिक : पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढ आणि भविष्यातील पिढ्यांसाठी वनसंपत्ती जपण्याच्या दृष्टीने महत्वाची अशी विविध कामे वन विभागातर्फे हाती घेण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणजे ‘एम. एस. वॉच टॉवर’ होय. हा टॉवर उभारून वन संपत्तीवर सतत लक्ष ठेऊन गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत धुळे वन विभागातील कॅम्पा अंतर्गत वृक्षलागवड क्षेत्रांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली असून, यासाठी वन विभागाच्यावतीने आवश्यक त्या भागात थेट ‘एम. एस. वॉच टॉवर’ उभारण्याची तयारी झाली आहे. विविध ठिकाणी चेन लिंक कुंपण उभारणी तसेच वॉच टॉवर बांधकामाची कामे प्रस्तावित आहेत. शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील एकूण जवळपास दहा ठिकाणी अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.
बोऱाडी (ता. शिरपूर) येथील गुऱ्हाळपाणी, बुडकी आणि धनवाडी या गावांमध्ये वृक्षलागवड क्षेत्राभोवती चेन लिंक कुंपण व मुख्य प्रवेशद्वार तसेच विकेट गेट उभारले जाणार आहेत. यासाठी अनुक्रमे सुमारे ७८.६४ लाख, ८०.११ लाख आणि ६८.३३ लाख रुपये इतकी अंदाजित तरतूद करण्यात आली असून, सांगवी परिसरातील जामन्यापाडा, चोंडीनाला, शेमल्या आणि चांदसूर्या या गावांमध्ये कॅम्पा अंतर्गत लागवड क्षेत्रांसाठी चेन लिंक कुंपण उभारण्यात येणार आहे. या चारही कामांची अंदाजित किंमत सुमारे ६८ लाख ते ७८ लाख रुपयांच्या दरम्यान असून, ही कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे आणि शेवाडे या गावांमध्ये प्रत्येकी दहा हेक्टर क्षेत्रातील वृक्षलागवड सुरक्षित ठेवण्यासाठी चेन लिंक कुंपण व प्रवेशद्वारे उभारली जाणार आहेत. यासाठी अनुक्रमे सुमारे ६९.७१ लाख आणि ७२.४२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. याशिवाय धुळे ३०१ परिसरात शिंदखेडा येथे वनसुरक्षेसाठी एम. एस. वॉच टॉवर उभारण्याचे काम प्रस्तावित असून, त्याची अंदाजित किंमत सुमारे १४.६७ लाख रुपये आहे. या सर्व कामांमुळे कॅम्पा अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचे संरक्षण अधिक सक्षम होणार असून, वनक्षेत्रात होणारी अतिक्रमणे, अवैध चराई, झाडतोड तसेच वन्यजीवांना होणारा त्रास कमी करण्यास मदत होणार आहे. चेन लिंक कुंपणामुळे लागवड क्षेत्रांची स्पष्ट मर्यादा निश्चित होऊन देखभाल सुलभ होईल, तर वॉच टॉवरच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना परिसरावर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढ आणि भविष्यातील पिढ्यांसाठी वनसंपत्ती जपण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार असून, धुळे वन विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.







