वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक State Bank of India (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे २०२६ रोजी दोन दिवसांच्या संपाची नोटीस दिली असून या काळात ग्राहकांनी आवश्यक बँकिंग कामे आगाऊ पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. बँकेच्या अधिकृत ‘X’ खात्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टमध्ये संपाच्या कालावधीतही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ग्राहकांना होणारा संभाव्य त्रास कमी करण्यासाठी पर्यायी बँकिंग सुविधांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बँकेने ग्राहकांना रोख रकमेच्या गरजांसाठी ATM आणि ADWM चा वापर करण्याचे, तसेच ग्राहक सेवा केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय इंटरनेट बँकिंग, YONO, मोबाईल बँकिंग, UPI आणि इतर डिजिटल माध्यमांना प्राधान्य देण्याचेही सांगण्यात आले आहे. संपामुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल SBI ने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, २३ आणि २४ मे रोजी शनिवार-रविवारच्या सुट्ट्या असून त्यानंतर ‘ईद’ची बँक सुट्टी येत असल्याने SBI च्या अनेक शाखा सलग सहा दिवस प्रभावित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाखेत प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या व्यवहारांसाठी ग्राहकांनी आधीच नियोजन करून कामे पूर्ण करावीत, असे बँकेने स्पष्ट केले आहे.







