नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे फोटो आपल्या पोस्टरवर सर्रासपणे वापरत आहेत. त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगलाच दम भरला आहे. माझे फोटो वापरू नका. नाही तर मी कोर्टात जाईन, असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. शरद पवारांच्या या जाहीर तंबीबाबत काय प्रतिक्रिया द्यावी या विवंचनेत अजित दादा गट पडला आहे. ते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी या मुद्द्यावर अजितदादा गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले की शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरुचे फोटो छापणारच. कायदेशीर कारवाई करतील तेव्हा बघू कोर्टाकडून काय निर्देश येतात ते. पण ते आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो लावणारच, असे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ठणकावून सांगितलं. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांचे आशीर्वाद राहिले पाहिजे. सध्या त्यांचे आशीर्वाद आहेत. ते एनडीएत येणार की नाही सांगू शकत नाही. त्याबाबत नेते निर्णय घेतील, असे आत्राम यावेळी म्हणाले.