मुंबई : प्रेमसंबंधाला अडथला निर्माण होणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार सोमवारी ॲन्टॉप हिल परिसरात घडला. पण रक्ताच्या डागांमुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. ॲन्टॉप हिल पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली. ॲन्टॉप हिल परिसरातील राजीव गांधी नगर येथील न्यू ट्रांजिट कॅम्प परिसरात ही घटना घडली. तेथील अनाबिया औषध दुकानाजवळ ईस्माइल अली शेख (३७) पत्नी सुमय्या(२५) सोबत राहत होता. व्यवसायाने भरतकाम करणाऱ्या ईस्माईलची हत्या पत्नी सुमय्या व तिचा प्रियकर साकलाईन गोलम किब्रिया शेख ऊर्फ झप्पर (३०) यांनी केली.
परिसरातील रहिवाशांना सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्यात रक्ताचे थेंब दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाताच ॲन्टॉप हिल पोलीस घटनास्थळी पोहोचले. ते घरात गेले असता तेथे इस्माइल शेख यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे निदर्शनास आले. मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आला असून तेथील डॉक्टरांनी चाकूच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ईस्माईलच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ईस्माइलची पत्नी सुमय्याची चौकशी सुरू केली. मात्र, ती वारंवार विरोधाभासी उत्तरे देत होती, त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर संशय आला. त्यानंतर समय्याला ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात आणून तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.





