पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी मतदारयादी वापरली जाणार आहे. १ जुलै २०२५ रोजी अंतिम करण्यात आलेली ही यादी ग्राह्य धरली जाणार असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाच्या यादीनुसार शहरातील ३५ लाख मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे.
महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभागनिहाय, मतदान केंद्रनिहाय या यादीची फोड केली जात होती. मात्र, या वेळी स्थानिक पातळीवरून मतदारयादी घेऊ नये, निवडणुकीसाठी केवळ आयोगाकडून देण्यात आलेली मतदारयादी ग्राह्य धरावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली जाणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम करण्यात आलेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. हीच यादी पुण्यासह अन्य महापालिकांसाठी वापरणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ३५ लाख मतदारांची मतदारयादी महापालिकेकडे प्राप्त झाली आहे.