मुंबई : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. विना वातानुकूलित लोकलच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कुर्ला कारशेडमध्ये काल पार पाडली. मात्र दरवाजे बंद असताना लोकलच्या डब्यातील हवा खेळती राहावी यासाठी जाळी, झडप यांचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरअखेर पर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांची विना वातानुकूलित लोकल मार्गस्थ करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. मुंब्रा स्टेशन परिसरात लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर आठ प्रवासी जखमी झाले होते. लोकलच्या दरवाजात लटकत प्रवास करताना हा प्रकार घडला. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल वातानुकूलित आणि सध्या सेवेत असलेल्या विना वातानुकुलित लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या चाचणीच्या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना उपस्थित होते.
विना वातानुकुलित लोकलचे दरवाजे बंद झाल्यावर हवा खेळती राहण्यासाठी दरवाजाच्या खालील भागात जाळी लावण्यात आली आहे. त्याच्या वरील बाजूस काचेचा वापर करण्यात आला आहे. दरवाजाच्या मध्यभागी झडपा असून पावसाळ्यात पाणी आत येऊ नये यासाठी त्या बसवण्यात आल्या आहेत. या लोकलचे दरवाजे १० सेकंदांत उघड – बंद होणार आहेत. हालचाल होताना अलार्मची व्यवस्था या विना वातानुकुलित ट्रेनच्या दरवाजासाठीही करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.