नवी मुंबई : नवी मुंबईतील Thane Creek Flamingo Sanctuary येथे सुरू असलेल्या फ्लेमिंगो बोट सफारीला यंदा पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे ११ हजारांहून अधिक पर्यटकांनी या अभयारण्याला भेट दिली असून, खाडीच्या पाण्यावर विखुरलेले फ्लेमिंगोंचे सुंदर थवे हे मुख्य आकर्षण ठरत आहेत. जलमार्गातून अगदी जवळून या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळत असल्यामुळे कुटुंबीय, विद्यार्थी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत.
डिसेंबरपासून सुरू झालेल्या हंगामाच्या सुरुवातीला फ्लेमिंगोंचे आगमन काहीसे कमी होते. मात्र फेब्रुवारीनंतर त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या ऐरोली, घणसोली आणि वाशी खाडी परिसरात १५ ते २० हजारांहून अधिक फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली ही बोट सफारी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरली आहे. नियोजित मार्गाने खाडीमध्ये फिरत पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करता येत असल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकही येथे आवर्जून भेट देत आहेत. विशेष म्हणजे, या अभयारण्यात फ्लेमिंगोंसह २०० हून अधिक पक्षी प्रजाती पाहायला मिळतात, त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, २१ डिसेंबर २०२५ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत १०,९५५ पर्यटकांनी येथे भेट दिली असून, सुमारे २८.९५ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हंगाम सुरू असतानाच ही संख्या वाढीच्या मार्गावर असून, एकूण पर्यटकसंख्या विक्रमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटक २५ मेपर्यंत फ्लेमिंगो बोट सफारीचा आनंद घेऊ शकतात.
प्रवेश शुल्क:
- प्रौढ व्यक्ती: ₹५५
- शालेय विद्यार्थी: ₹३०
- विदेशी विद्यार्थी: ₹५५
- विदेशी प्रौढ: ₹११०
- ५ वर्षांखालील मुले: विनामूल्य







