पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपी) कंपनी तोट्यात चालली आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी बस मार्गांचे सुसूत्रीकरण, नवीन बसची खरेदी यासह इतर विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएमपी’च्या डेपोंचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्यासाठी, उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली,’ अशी माहिती ‘पीएमपी’चे संचालक आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
‘पीएमपीएमएल’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर महापालिका भवन येथे पत्रकारांशी बोलताना आयुक्त नवलकिशोर राम यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांची माहिती दिली. राम म्हणाले, ‘पीएमपी आर्थिक सक्षम झाल्याशिवाय उपाय नाही. यासाठी बसची संख्या वाढविण्याचा विषय चर्चेला आला. प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने एक हजार सीएनजी बस घेण्याचा विषय कार्यपत्रिकेवर होता. यामध्ये ‘टाटा’ आणि ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या बस घेण्याबाबत चर्चा झाली.’ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘‘पीएमपी’च्या ताफ्यात आठ डबल डेकर बस येणार आहेत. त्यांची ‘ट्रायल रन’ देखील घेण्यात आली आहे. या डबल डेकर बस ज्या मार्गांवर धावणार त्या मार्गांवर झाडांच्या फांद्या, लटकणाऱ्या वायर यांसारखे अडथळे असू नयेत. हे अडथळे नसतील, असेच मार्ग डबल डेकर बससाठी निवडण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर चार मार्गांवर आठ बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच या बस सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.