मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण जानेवारी २०२३मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमावर मुंबई महापालिकेने केलेल्या आठ कोटी रुपयांचा खर्च म्हणजे ही मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टीच असल्याची टीका पालिकेतील माजी नगरसेवकांनी केली आहे. या कार्यक्रमाच्या अवाढव्य खर्चाचे ऑडिट करण्याची मागणीही केली आहे.
येत्या काही महिन्यांत निवडणुकांची शक्यता आहे. मात्र त्याआधी मुंबई महापालिकेच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन कार्यक्रमही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमांवरही कोट्यवधी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जानेवारी २०२३ मध्ये मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमावर ८ कोटी ३३ लाख ५९ हजार ८५१ रुपये खर्च करण्यात आले होते.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही होतील. त्याआधी पालिकेच्या कोस्टल रोडसह अनेक विविध प्रकल्पांची कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे पालिकेच्या या प्रकल्पांसाठी आणखी मोठे उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता असून त्यासाठीही अवाढव्य खर्च होण्याची शक्यताही नगरसेवकांकडून वर्तवण्यात आली.





