मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रकाशित करणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून तातडीने लेखक भारद्वाज, निना मुखर्जी तसेच संबंधितावर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज एका लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत हीन पातळीवरील चिखलफेक केली आहे . शरयू फौंडेशन ट्रस्ट नावाची संस्था ही “इंडिक टेल्स” ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ असे घाणेरडे आरोप या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या ऐतिहासिक कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. अशा नराधमांना ताबडतोब अटक करा
अशी तिव्र मागणी सदर निवेदनात केली आहे .
भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे ट्विटरह थ्रेड्स तपासले असता सदर व्यक्तीने महात्मा गांधींपासून ते इतर अनेक महनीय व्यक्तींविरुद्ध आक्षेपार्ह्य व एककल्ली लिखाण केले असल्याचे दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद करून सर्व संबंधित लोकांचे आणि संस्थेचे प्रोफाईल सुद्धा पत्रासोबत जोडण्यात आले आहे.
दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने संबंधित लेखक आणि वेबसाईटचा आंदोलन करुन तीव्र निषेध व्यक्त केला.





