मुंबई : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी सुमारे ५ वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्राध्यक्षांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी सायप्रस प्रजासत्ताकचे उच्चस्तरीय अधिकारी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस आयुक्त देवेन भारती तसेच मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळावरील स्वागत समारंभानंतर राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज महाल पॅलेसकडे प्रयाण केले. त्यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि सायप्रस यांच्यातील राजनैतिक तसेच आर्थिक संबंधांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हॉटेल ताज महाल पॅलेस परिसरातील ‘ट्री ऑफ लाइफ’ स्मारकाजवळ त्यांनी आणि प्रथम महिला फिलिप्पा कारसेरा यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदर व्यक्त केला. तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून स्मारकाला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वातावरण अत्यंत भावनिक आणि गंभीर झाले होते. २६/११ हल्ल्यातील निष्पाप नागरिक आणि सुरक्षा दलांच्या बलिदानाचे स्मरण करत राष्ट्राध्यक्षांनी शोकभावना व्यक्त केल्या. सायप्रसच्या प्रतिनिधीमंडळानेही स्मारकाला अभिवादन करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली. मुंबईतील या भेटीद्वारे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.







