सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माण तालुक्यातील तुपेवाडी-वरकुटे गावात छापा टाकून १० लाखांचा ४० किलो गांजा जप्त केला. शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड आणि झाडांची जोपासना करणाऱ्या शहाजी दाजी तुपे (रा. तुपेवाडी-वरकुटे, ता. माण) या संशयितावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावले होते. त्यातील एका खबऱ्याने माण तालुक्यातील तुपेवाडी-वरकुटे गावात शहाजी दाजी तुपे याने आपल्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली.
खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी आपल्या पथकाला तत्काळ कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार एलसीबीचे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने तुपेवाडी-वरकुटे गावात जाऊन छापा टाकला असता संशयिताच्या शेतात गांजाची ४० झाडे आढळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली. शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्रीसाठी झाडांची जोपासना केल्याप्रकरणी शहाजी दाजी तुपे याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी संयुक्त कारवाई करून संशयिताच्या शेतातून १० लाख रुपये किंमतीची ओल्या गांजाची झाडे, तसेच सुकत घातलेली गांजाची हिरवट पाने, फुले, बारीक काड्या, असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एनडीपीएस ॲक्ट प्रमाणे संशयितावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. म्हसवड पोलीस पुढील तपास करत आहेत.