नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील महापे एमआयडीसी औद्योगिक परिसरात शासन नियंत्रित दरातील शिधाजिन्नसांची मोठ्या प्रमाणावर अवैध खरेदी-विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून नागरी पुरवठा विभागाच्या फिरत्या पथकाने गुरुवारी (२० नोव्हेंबर) रात्री कारवाई केली. कारवाईदरम्यान, रेशनिंगचा गहू-तांदुळ असा मिळून एकूण ४ लाख ६९ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मे. सिमोज इंटरप्रायझेस या औद्योगिक युनिटमध्ये शासन नियंत्रित दरातील धान्याची अवैध साठवणूक केली जात असल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या फिरत्या पथकाने रात्री सुमारे १० वाजता परिसरात धाड टाकली. मिलच्या कंपाऊंडमध्ये रॅम्पवर उभ्या असलेल्या टाटा इंट्रा वाहनामधून धान्य उतरवण्याच्या तयारीत दोन जण असल्याचे आढळले. चौकशीत त्यांची नावे पिंटू रामप्रसाद कोरी (टेम्पो चालक) आणि सचिन पनवाल (हमाल) अशी समोर आली. तर वाहनामधील गोण्यांमध्ये पलटी केलेल्या रेशनिंगचा गहू-तांदूळ असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता ५० किलो वजनाच्या ४१ गोण्या गहू, ३० किलो वजनाच्या ९ गोण्या गहू, ५० किलो वजनाच्या २१ गोण्या तांदूळ आणि ३० किलो वजनाच्या ५ गोण्या तांदूळ असा मोठा साठा आढळून आला. हा सर्व माल शासनाच्या रेशनिंग दुकानेतून पलटी करून काळाबाजारत विक्रीसाठी आणल्याची पथकाला खात्री पटली. वाहनचालक पिंटू कोरी याने हा माल अँटॉप हिल परिसरातून आणल्याची कबुली दिली. पुढील विक्रीसाठी मे. सिमोज इंटरप्रायझेसचे मालक शिवलाल गेहलोत व राजन सिंग यांच्याकडे माल पोहोचवला जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. वाहनमालक आशिष पमिजा याचेही या व्यवहारात थेट सहभागी असल्याचे समोर आले. या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील तरतुदींनुसार चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







