मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडणाऱ्या या मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक सुरक्षा निर्बंध लागू करण्यात आले असून काळ्या रंगाचे कपडे आणि काही काळ्या वस्तूंना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येकाची तपासणी केली जात असून काळे शर्ट, टी-शर्ट किंवा अन्य काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या व्यक्तींना आत प्रवेश नाकारला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या मते, काळा रंग हा आंदोलन आणि निषेधाचे प्रतीक मानला जातो. मेळाव्यादरम्यान कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी, निषेध किंवा गोंधळ होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रमुख नेत्यांची भाषणे सुरू असताना काळे रुमाल, झेंडे किंवा अन्य वस्तू दाखवून विरोध दर्शविण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. शिवसेनेतील संभाव्य राजकीय हालचाली, पक्षांतराच्या चर्चांमुळे आणि विविध राजकीय घडामोडींमुळे मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. प्रवेशद्वारांवर केवळ कपड्यांचीच नव्हे तर इतर वस्तूंचीही तपासणी केली जात आहे. काळ्या रंगाची पॉवर बँक, बॅग किंवा इतर संशयास्पद वस्तू घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. अशा वस्तू बाहेर ठेवूनच कार्यकर्त्यांना सभास्थळी प्रवेश दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त पाहायला मिळत असून कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.






