मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे. जळगावचा २८ वर्षीय भूषण ठाकरे याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकत हा मान पटकावला. त्याने ७ कोटी रुपयांच्या अंतिम प्रश्नापर्यंत मजल मारली, मात्र त्या प्रश्नाचे अचूक उत्तर देता न आल्याने त्याचा प्रवास १ कोटी रुपयांवरच थांबला. एकेकाळी खिशात अवघे २४ रुपये घेऊन मुंबईत आलेल्या भूषणचा संघर्षातून यशापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मात्र, १ कोटी रुपये जिंकूनही त्याच्या हातात संपूर्ण रक्कम येणार नाही.
भारतामध्ये गेम शो आणि स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांवर आयकर कायद्यानुसार ३० टक्के कर आकारला जातो. याशिवाय कराच्या रकमेवर ४ टक्के आरोग्य व शिक्षण उपकर (सेस) आकारला जातो. त्यामुळे १ कोटी रुपयांच्या बक्षिसावर प्रथम ३० लाख रुपये आयकर वजा होतात. त्यानंतर त्या करावर १ लाख २० हजार रुपयांचा सेस आकारला जातो. अशा प्रकारे एकूण ३१ लाख २० हजार रुपये कर स्वरूपात वजा झाल्यानंतर भूषण यांच्या हातात अंदाजे ६८ लाख ८० हजार रुपये येऊ शकतात. मात्र, अंतिम रक्कम त्यांच्या आर्थिक वर्षातील एकूण करपात्र उत्पन्नावर अवलंबून असेल. जर त्यांचे एकूण करपात्र उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १ कोटी रुपयांपर्यंत असेल, तर त्यावर १० टक्के अधिभार (सर्चार्ज) लागू होऊ शकतो. अशा परिस्थितीत सुमारे ३ लाख रुपयांचा अतिरिक्त अधिभार आणि त्यावरील १२ हजार रुपयांचा सेस भरावा लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या हातात प्रत्यक्षात सुमारे ६५ लाख ६८ हजार ते ६८ लाख ८० हजार रुपये येण्याची शक्यता आहे. भूषण ठाकरे यांनी या बक्षिसातील रक्कम कुटुंबाच्या मदतीसाठी आणि वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी वापरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

