पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली असून, या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात मोठ्या संख्येने जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागात येणाऱ्या अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे लावावीत.






