मुंबई : महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या निर्देशानंतर, बेस्ट प्रशासनाने त्यांच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. बेस्टच्या मालकीच्या २४९ बसेसमध्ये ४०० हून अधिक कॅमेरे बसवले जातील. निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, फेब्रुवारीपर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्व बसेस सीसीटीव्ही देखरेखीखाली येतील. मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे आणि वस प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एक प्रमुख मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त कार्यालयाने बेस्ट उपक्रमाला सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या खाजगी कंत्राटदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, परंतु बेस्टच्या मालकीच्या बसेसमध्ये कॅमेरे नाहीत. यामुळे छेडछाड आणि खिसेमारीच्या घटना घडत आहेत. बसेसवरील सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारांना ओळखण्यास आणि तपास करण्यास मदत करतील.
प्रत्येक बसमध्ये ३ कॅमेरे :
१. पुढील बाजू: चालकाजवळच्या पायऱ्यांपाशी, जेथून चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवता येईल.
२. मागील बाजू: बसच्या शेवटच्या भागात, ज्यामुळे संपूर्ण बसमधील हालचाली स्पष्ट दिसतील.
३. रिव्हर्स कॅमेरा: अपघात टाळण्यासाठी बसच्या मागे अतिरिक्त कॅमेरा असेल, ज्याद्वारे चालकाला मागचे दृश्य स्पष्ट दिसेल.






