मुंबई : राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामुहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही महिन्यात सातत्याने महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी २ हजार २१५ कोटी रूपये राज्य सरकारने वितरीत करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट रद्द करून शेत नोंदीप्रमाणेच ही मदत होईल. पुढच्या २-३ दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती आमच्याकडे पोहचेल. काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती. तिथे आपण अधिकचा वेळ दिला आहे. २-३ दिवसांत ही माहिती पोहचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, जमीन खरडून गेलेली असेल त्याकरता मदत, विहिरींसाठी मदत, घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या नुकसानीबाबत सर्वसमावेशक धोरण आखून आम्ही मदत करणार आहोत असं त्यांनी सांगितले.