पुणे : एआयचा सध्या जगभरात बोलबाला आहे. एआयच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. हे आधीच स्पष्ट झालेलं असताना पिंपरी- चिंचवडमध्ये एआय च्या माध्यमातून अश्लील फोटो एडिट करण्याची धमकी देणाऱ्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकरण इन्स्टाग्रामच्या फेक अकाउंटवरून समोर आलं आहे. याप्रकरणी वीस वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने तक्रारदार तरुणीचे नाव आणि फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. बनावट अकाउंटवरून तक्रारदार तरुणीला मॅसेज केला. याबाबत तरुणीने “तू कोण आहेस” अस विचारलं. परंतु, अज्ञात आरोपीने उत्तर दिलं नाही. पोलिसात तक्रार देणार असल्याच म्हटल्यावर देखील तरुणीला अज्ञात आरोपी मॅसेजद्वारे त्रास देत होता. दोन दिवसांपूर्वी तरुणीच्या इन्स्टाग्रामवरील फोटो एआय च्या साहाय्याने एडिट करून फोटोमधील ड्रेस बदलून तो तरुणीला पाठवला. तसेच अशा पद्धतीने अश्लील फोटो एडिट करून पाठवण्याची धमकी दिली. आरोपीने तरुणीच्या इतर मित्रांना इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एआयवरून फोटो एडिट करून तरुणीला अज्ञात आरोपीने नाहक त्रास दिला आहे. अश्लील फोटो एडिट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.