अहिल्यानगर : कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २) सकाळी तारकपूर बसस्थानकात घडला. सुरेश चंद्रभान धामोरे (५४, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात मद्यप्राशन केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल आहे.
तारकपूर बसस्थानकातील शिवाजी मारुती खजिनदार यांनी धामोरे यांनी मद्यप्राशन केल्याबाबतची फिर्यादी दिली होती. धामोरे हे बुधवारी तारकपूर बसस्थानकात कर्तव्यावर होते. मयत चालक धामोरे व वाहक संभार अजय पुंडलिक, अशा दोघांची बस (क्र. ४० एन ८८८७) तारकपूर ते घोसपुरी, दोन ट्रिपसाठी नेमणूक करण्यात आली होते. ते दोन ट्रिप करून बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस घेऊन तारकपूर बसस्थानकात आले. त्यावेळी फिर्यादी यांना चालक धामोरे यांनी मद्यप्राशन केले असल्याचा संशय आला. ही माहिती आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांना दिली. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून बस चालविल्यास प्रवाशांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्यादी हे धामोरे यांना घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी चालक धामोरे यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात चालकाविरोधात रात्री गुन्हा दाखल झाला. त्यानंतर चालक धामोरे यांनी बसस्थानकातील बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.