पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने पुण्यात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर आता ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्जही सादर करण्यात आला आहे. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. दिल्लीतील आंदोलनातही हीच भूमिका मांडण्यात आली होती. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
कॉकरोच जनता पार्टीची चर्चा मागील काही आठवड्यांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली आहे. १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान बेरोजगार युवकांबाबत झालेल्या एका वक्तव्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने संघटना उभारली. युवकांच्या रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. अल्पावधीतच या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर लाखो युवकांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवल्याचे सांगितले जात असून विविध सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील आगामी आंदोलनामुळे नीट पेपरफुटी प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






