भाईंदर : मीरा -भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर वास्तव करणारे बांगलादेशी, नायजेरियन नागरिक राहत असल्याचे आढळून येत आहेत. या विदेशी नागरिकांवर पोलिसांकडून वेळोवळी कारवाई केली जात आहे. कारवाई होत असताना या विदेशी नागरिकांना घर भाड्याने देणे किंवा त्यांना कामावर ठेवणे, त्यांना आश्रय देणार्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे. मीरा- भाईंदरमध्ये विविध भागांत नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव करत आहेत. गेल्या आठवड्यात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव करणार्या सहा बांगलादेशी महिलांवर मीरा रोड, नयानगर आणि नवघर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली आहे. या बांगलादेशी महिलांकडे इकडे राहण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दिवसेंदिवस विदेशी नागरिकांचे वास्तव वाढत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मीरा- भाईंदर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विदेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शहरातील नागरिक या विदेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या घरकाम किंवा इतर कामांसाठी ठेवतात. परंतु, कामावर ठेवताना त्या व्यक्तीचे नाव, गाव आता कोठे राहते, त्या व्यक्तीकडे आपल्या देशात राहण्याचे पुरावे आहेत का? याची तपासणी करत नाहीत, त्यामुळे या लोकांचे वास्तव वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी या विदेशी नागरिकांबाबत स्थानीक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.





