पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने राहत्या खोलीत टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्वारगेट पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप मूळचा कोल्हापूरमधील होता. तो अविवाहित होता. शहर पोलिसांत पोलीस शिपाई म्हणून काही वर्षांपुर्वी भरती झाला होता. पोलीस मुख्यालयात तो ‘ए’ कंपनीत नेमणूकीला होता. तो मित्रासोबत स्वारगेट पोलिस वसाहतीत बिल्डींग क्रमांक सहामध्ये राहत होता. दरम्यान, सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तो खोलीवर असताना त्याने हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास घेतल्याचे दिसून आले. लागलीच याची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याजवळ सुसाईड नोट मिळालेली नाही. त्याचा मोबाईल जप्त केला आहे, असे खडक पोलिसांनी सांगितले.





