भाईंदर : सत्तेत नसतानाही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाने मिरा भाईंदर शहरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. रामनवमी औचित्य साधून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मिरा भाईंदर शहरात लोकसंख्येच्या तुलनेत मोफत रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून २४ तासात कार्यरत असलेले रुग्ण वाहिका उपलब्ध करून देण्याचा मनसे पक्षाने प्रयत्न केला आहे. याशिवाय रुग्णवाहिकांच्या नावाखाली होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मनसेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक दीपक शर्मा, शहर संघटक शशी मेंडन, शहर सचिव हरेश सुतार, माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, विधानसभा अध्यक्षा वैशाली येरूनकर, उपशहर अध्यक्षा दृष्टी घाग, हिम्मत भोईर, लीला खडसे, शहर सचिव दिलीप घाग, विभाग अध्यक्ष उदय साताराडेकर, योगी भोईर, रत्ना मंडल आदींचा समावेश होता. मनसेकडून सुरू करण्यात आलेल्या या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे शहरातील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवेत नागरिकांना तातडीची मदत मिळण्यास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.






