नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘अन्न व औषध प्रशासन, नागपूर’ च्या विभागीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण केले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत ५ मजली असून इमारतीचे बांधकाम १५०० चौरस मीटरवर करण्यात आले आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत. इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल. या इमारतीचे बांधकाम ₹१५ कोटी १७ लाखांच्या निधीतून करण्यात आले आहे.
नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अन्नपदार्थांची वाहतूक व वितरण येथून मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अन्नपदार्थ साठविण्यासाठी शीतगृहे, वेअर हाऊस, लॉजिस्टिक पार्क येथे मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांना सुरक्षित पदार्थ उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधे व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी नमुन्यांची दर्जात्मक व गुणात्मक विश्लेषण करणे ही महत्त्वाची बाब आहे. या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्र सामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.







