पुणे : मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २८ हजार विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सापडले आहेत. या प्रवाशांकडून रेल्वेने २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे. रेल्वेच्या या विशेष मोहिमेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.
या दंडाच्या रक्कमेमुळे पुणे रेल्वे विभागाला मोठा फायदा झाला असून प्रवाशांना वचक बसला आहे. तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, तसेच वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करीत आहेत. त्यातच काही प्रवासी एका श्रेणीचे तिकीट काढून दुसऱ्या श्रेणीतून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे. काही प्रवासी थर्ड क्लासचे तिकीट काढून फस्ट क्लासमध्ये देखील प्रवास करीत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २८ हजार बेशिस्त आणि विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून आले आहेत.





