डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव प्रभाग हा उंच, सखल भूभाग आहे. या भागात पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबू नये म्हणून गटार, नाल्यांची पाहणी करत असताना ग प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना आयरे गाव हद्दीत गटार, नाले बुजवून बेकायदा चाळी उभारल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने तोडकाम पथकाला पाचारण करून गटार, नाल्यांचे प्रवाह बुजवून उभारलेल्या बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.
मुसळधार पाऊस सुरू झाला की कोपर पूर्व रेल्वे स्थानक, भोपर, आयरे प्रभागात हरितपट्ट्यांवर मागील पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या बेकायदा चाळी, इमारतींमुळे आयरे गाव परिसर नेहमीच पुराच्या पाण्याखाली जातो. आपल्या प्रभाग हद्दीत कोठेही पाणी तुंबणार नाही. सखल भाग असेल तर तेथे पाणी साचणार नाही, नाले, गटारांमधील पाणी सळसळ वाहून जाईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.







