नवी दिल्ली : देशातील पोल्ट्री उद्योग आणि कुक्कुटपालन क्षेत्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बर्ड फ्लू (H5N1) विषाणूपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी भारताने पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. भोपाळ येथील ICAR-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था (NIHSAD) यांनी ही लस विकसित केली असून, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी या लसीचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने या लसीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ही निष्क्रिय (Inactivated) लस H5N1 च्या क्लेड 2.3.2.1A या विषाणू प्रकाराविरोधात विकसित करण्यात आली असून, या विशिष्ट प्रकाराविरोधात भारतात तयार झालेली ही पहिली स्वदेशी लस आहे. बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा गंभीर संसर्गजन्य आजार असून, संसर्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. संसर्ग रोखण्यासाठी बाधित पक्ष्यांना नष्ट करावे लागते, तसेच व्यापारावर निर्बंध येत असल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. भारतात २००६ मध्ये प्रथम बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नोंदवला गेला होता आणि त्यानंतर H5N1 व H5N8 या विषाणूंचे मिळून ५०० हून अधिक उद्रेक नोंदवले गेले आहेत.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, बर्ड फ्लूचा मोठा उद्रेक झाल्यास देशाच्या जीडीपी वाढीवर सुमारे १.५ टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. २००६ मधील उद्रेकामुळे भारताला २,२०० ते ३,००० कोटी रुपयांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय H5N1 विषाणूचा संसर्ग काही सस्तन प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्येही आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २००३ पासून २५ देशांमध्ये H5N1 संसर्गाची १,००३ मानवी प्रकरणे नोंदली गेली असून, त्यापैकी ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषाणूवर नियंत्रण मिळवणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, H5N1 क्लेड 2.3.2.1A प्रकाराविरोधात संरक्षण देणारी विशिष्ट व्यावसायिक लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे देशातच स्वदेशी लस विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. NIHSAD ने विकसित केलेली ही लस कोंबड्यांचे संरक्षण करण्याबरोबरच पोल्ट्री उद्योगाचे आर्थिक नुकसान कमी करण्यास आणि पक्ष्यांमधून इतर प्राणी व माणसांपर्यंत विषाणूचा प्रसार रोखण्यास महत्त्वाची ठरण्याची अपेक्षा आहे. २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रार्पणानंतर या लसीच्या वापराची प्रक्रिया आणि उपलब्धतेबाबत पोल्ट्री व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

