मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या ‘मुंबई वन’ ॲपला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ॲपला ८ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले असून, या कालावधीत ॲपवरून तब्बल एक कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच या ॲपचे नऊ लाख १९ हजारांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते झाले आहेत. ‘मुंबई वन’ ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मेट्रो, मोनोरेल, बेस्ट, रेल्वे यांसह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांची तिकिटे एकाच ठिकाणाहून खरेदी करता येतात. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज राहिलेली नाही. आता या ॲपमध्ये आणखी एक महत्त्वाची सुविधा जोडली जाणार असून, लवकरच प्रवाशांना ‘मुंबई वन’ ॲपवरून विमान तिकिटाचे आरक्षणही करता येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘मुंबई वन’ ॲप सुरू करण्यात आले. भारतातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी झाली असून, एका प्रवासासाठी अनेक ठिकाणी तिकीट घेण्याचा त्रासही टळला आहे. सध्या या ॲपवरून मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिका तसेच नवी मुंबई मेट्रोसाठी तिकीट खरेदी करता येते. याशिवाय मोनोरेल, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी), मिरा-भाईंदर परिवहन (एमबीएमटी), कल्याण-डोंबिवली महानगर परिवहन (केडीएमटी) आणि नवी मुंबई महानगर परिवहन (एनएमएमटी) या सेवांसाठीही या ॲपचा वापर करता येतो. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षात या ॲपवरून एक कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची नोंदणी झाली असून, वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुंबई वन’ ॲपमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून आता विमान तिकीट आरक्षणाची सुविधा सुरू करण्यासाठी ॲपमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीपासून विमान प्रवासापर्यंत विविध सेवांसाठी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे.






