मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर धारावीतील अपात्र रहिवाशांसाठी भाडेतत्त्वावरील घरे बांधण्यात येणार आहेत. या ४ हजार घरांच्या प्रत्यक्ष बांधकामाला महिनाभरात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) सचिव विपीन पालीवाल यांनी दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र धारावीकरांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, पहिल्यांदाच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे.
अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर भाडेतत्त्वावरील घरांमध्ये जागा दिली जाणार आहे. यासाठी मुंबईतील विविध मोकळ्या जागांची मागणी डीआरपीने केली होती. त्यानुसार मुलुंड, कुर्ला मदर डेअरीसह अन्य ठिकाणच्या जागा गृहनिर्मितीसाठी देण्यात आल्या आहेत. कुर्ला मदर डेअरीची सुमारे २१ एकर जागा डीआरपीला देण्यात आली असून, त्यातील काही जागा हस्तांतरित झाली आहे. उपलब्ध जागेवर डीआरपी आणि अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एएनडीपीएल) पुढील कार्यवाही सुरू आहे. पुनर्वसन घटकाअंतर्गत येथे ४ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार घरे बांधून ती २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. माटुंग्यातील रेल्वेच्या जागेवर काही घरांचे काम सुरू असून, ते ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. दरम्यान, कुर्ला मदर डेअरीची जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. ही जागा गृहनिर्मितीसाठी न वापरता उद्यानासाठी राखून ठेवावी, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी स्थानिकांनी जनआंदोलनही उभारले आहे. मात्र, विरोध कायम असतानाही येथे घरांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.





