मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला राज्यासह देशभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र, या प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल, सोन्याच्या साखळ्या आणि इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. विसर्जन मार्गावर झालेल्या चोरीच्या घटनांमुळे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल चोरीच्या सुमारे २०० तक्रारी प्राप्त झाल्या असून, १९२ मोबाईल हरवल्याची प्रकरणे अधिकृतपणे नोंदवण्यात आली आहेत. याशिवाय मोबाईल आणि सोन्याच्या साखळ्या चोरीसंदर्भात १० स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या संशयित टोळ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह १८ संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून १४ चोरीचे मोबाईल फोन आणि ७ सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीत मोबाईल चोरीच्या रॅकेटमध्ये अल्पवयीन, तरुण आणि महिलांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीत भाविकांच्या पिशव्या आणि खिशांवर डल्ला मारताना दोन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. विसर्जन मार्गावरील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. चोरीला गेलेले उर्वरित मोबाईल, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रचंड गर्दीचा फायदा घेत संघटित टोळ्यांनी या चोरीच्या घटना घडवल्याचा पोलिसांना संशय असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसेच आगामी मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.






