नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली. त्यामुळे नव्या वर्षात ऐरोली नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता असून, १२ वर्षांपासूनची नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार आहे. या नाट्यगृहाचे भूमिपूजन होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत.
काम अंतिम टप्प्यात असताना नाट्यगृहाला आग लागण्याची घटनाही घडली होती. मात्र, आता रखडलेल्या कामाला गती मिळाली असून काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवी मुंबईचा दिघ्यापर्यंत विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली परिसरातील नागरिकांसाठी मनोरंजनाचे हक्काचे ठिकाण असावे, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून होत होती. २४ जुलै २०१३ रोजी महापालिका सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून २० ऑगस्ट २०१४ रोजी मे. महावीर रोड्स अॅड इन्फ्रा. प्रा. लि. यांना कंत्राट देण्यात आले होते. त्यावेळी ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, आर्थिक अडचणींचे कारण देत ठेकेदाराने काम न केल्याने सुमारे सहा वर्षे काम रखडले. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्याने निविदा काढून काम मार्गी लावले. जुलै २०२१ मध्ये हे काम सुपर कंस्ट्रक्शनला देण्यात आले. आता नाट्यगृहासाठी ७० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. नाट्यगृहात दोन तळघरांत कार पार्किंग, तळमजल्यावर तिकीट घर, प्रसाधनगृह व रंगीत तालीम कक्ष, तर विविध मजल्यांवर ग्रीन रूम, प्रशासकीय दालन, बहुउद्देशीय सभागृह, अतिथीगृह व उपहारगृहाची सुविधा असेल. ऑर्केस्ट्रा आसनव्यवस्था ४७४, दिव्यांगांसाठी ४ आणि बाल्कनीत ३८२ आसने असून एकूण ८६० आसने असतील.






