पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि विविध शासकीय भरती परीक्षांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढला. सकाळी १० वाजता ओंकारेश्वर मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. परीक्षा वेळेत न होणे, भरती प्रक्रियेला होणारा विलंब, निकालातील अडचणी, रिक्त पदे न भरणे तसेच स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, अनेक परीक्षा आणि भरती प्रक्रिया महिनोनमहिने रखडल्यामुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होत आहे. वारंवार बदलणारे वेळापत्रक, विलंबित निकाल आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चितता यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनाला मोठा राजकीय पाठिंबा मिळाल्याचेही पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत त्यांनी सरकारने भरती प्रक्रिया गतीमान करून प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी भूमिका मांडली. आंदोलनात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. रस्त्यांवर नजर जाईल तिथपर्यंत विद्यार्थ्यांचे लोंढे दिसत होते. शांततापूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या या मोर्चावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेतही काही ठिकाणी बदल करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शासनाकडून ठोस निर्णय आणि निश्चित कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकार या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणते निर्णय घेते, याकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय?
- MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेऊन तिथे तत्काळ स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत
- गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर ८ दिवसांत स्पष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी
- राज्यसेवा मुख्य २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी
- मुंबई क्राईम ब्रँचनेMPSC ला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा
- अटक आरोपी अवर सचिव अभिजीत लेंडवेच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे
- आरोपी लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या सेवाकाळाची व पदोन्नती निकषांची सखोल चौकशी व्हावी
- तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवड झालेल्या उमेदवारांचे सीडीआर (CDR) तपासावेत
- प्रविण पाटील व मयुर ठाकरे व्यतिरिक्त इतर एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी व्हावी
- इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी
- ‘DI’ मधील संशयास्पद निकालांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे
- २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्यावी
- लघुलेखक (Stenographer) पद पुनर्जीवित करण्यात यावे





