मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, कोल्हापूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नवे स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उप सचिव आबासाहेब कवळे, सहसंचालक सुधीर मोरे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या प्रकल्पाची संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न ठेवता आधुनिक मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्याची आहे. त्यामुळे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग यांसारख्या विविध खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याशिवाय क्रिकेट म्युझियमची उभारणी, आधुनिक प्रशिक्षण व्यवस्था आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर म्हणजेच ३१.९० एकर शासकीय जागा सामंजस्य कराराअंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारावर स्वाक्षऱ्या करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) यांच्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये आधुनिक पॅव्हेलियन, सरावासाठी स्वतंत्र मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, खेळाडू, अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहनतळ, अंतर्गत रस्ते, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रिकेटला नवी चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होण्याची शक्यता वाढून क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, स्थानिक व्यवसायांना गती मिळेल आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.






