मुंबई : राज्यात ऑनलाइन ॲप आधारित सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने तातडीने नियमावली तयार करावी आणि या सेवेला आवश्यक परवानग्या द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘सहकार भारत टॅक्सी’ ही सेवा लवकरच मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सेवेमुळे लाखो चालकांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (भारत टॅक्सी) संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विविध आमदार, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ॲप आधारित सहकारी टॅक्सी सेवा चालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि नागरिकांना अधिक दर्जेदार व विश्वासार्ह वाहतूक सेवा उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता राज्यातील छोट्या शहरांमध्येही विस्तारली जाणार आहे.
सध्या ऑनलाइन ॲप आधारित टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांकडून दिली जात असली तरी चालकांना सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर चालकांना केवळ कामगार न ठेवता सहकाराच्या माध्यमातून मालक बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळदेखील ‘छावा’ या नावाने स्वतंत्र ॲप विकसित करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, मुंबईत सेवेला प्रारंभ झाल्यानंतर पुणे आणि नागपूरमध्येही ती सुरू केली जाईल. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सुमारे दोन कोटी व्यावसायिक चालकांचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.







