वृत्तसंस्था : मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून अमेरिकन लष्कराने बुधवारी पहाटे इराणच्या केश्म बेटावर मोठा हल्ला केला. ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाजवळ असलेल्या या बेटावरील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) च्या माहितीनुसार, इराणने यापूर्वी आपल्या शेजारील देशांवर अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. कुवेतच्या दिशेने सोडण्यात आलेली दोन क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच निकामी झाली, तर बहारीनकडे डागण्यात आलेली तीन क्षेपणास्त्रे अमेरिका आणि बहारीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली. या घटनांनंतर बहारीन आणि कुवेतमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या घडामोडींमुळे आखाती प्रदेशात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दरम्यान, या संघर्षाची ठिणगी अमेरिकेने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’जवळ इराणच्या एका तेलवाहू जहाजावर केलेल्या कथित हल्ल्यामुळे पडल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने केला आहे. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रूमचे नुकसान झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित संयुक्त जहाजावर सागरी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर अमेरिकेने केश्म बेटाच्या दक्षिण भागातील IRGC चे दळणवळण केंद्र आणि लष्करी तळांवर कारवाई केली. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने बहारीनमधील अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लीट’ नौदल मुख्यालयासह काही लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा केला. मात्र, अमेरिकेने हे सर्व हल्ले निष्फळ ठरल्याचे सांगत आपले सैन्य पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठा आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण जगाचे लक्ष आता या संघर्षाच्या पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.







