मुंबई : राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिस ब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.
सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू” असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतः च्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन आयुक्तांनी केली आहे. नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे, तसेच एक टोल-फ्री क्रमांक (१८००२२२३६५) देखील कार्यान्वित करण्यात आला आहे. औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सह आयुक्त, (औषधे) गणेश. रा. रोकडे यांनी कळविले आहे. आयुक्त मुंढे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये मोहीम राबवण्यात आली.‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चा भंग केल्याप्रकरणी विभागनिहाय कारवाईमध्ये मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या नागपूर (रु.७,२६,७५५), नाशिक (रु.७,१०,९४५), पुणे (रु.१४,६८,९८१), बृहन्मुंबई (रु. १,८५,६००), कोकण विभाग (रु.१८,५८,०००), अमरावती (रु.१,४२,२२९), छत्रपती संभाजीनगर (रु.४८७१८) औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औषध निरीक्षकांच्या कारवाईत सदर साठा जप्त करण्यात आला. व पुणे विभाग येथील तपासणीदरम्यान आढळलेल्या ०२ एलोपथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल रु. २१,८३,४२८/- चा साठा सुद्धा जप्त करण्यात आला आहे.
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा औषध साठा जप्त:
नागपूर – (रु.७,२६,७५५)
नाशिक – (रु.७,१०,९४५)
पुणे – (रु.१४,६८,९८१)
बृहन्मुंबई – (रु. १,८५,६००)
कोकण विभाग – (रु.१८,५८,०००)
अमरावती – (रु.१,४२,२२९)
छत्रपती संभाजीनगर – (रु.४८७१८)







