वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल २०२६च्या क्वालिफायर-२ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चमकला. संघाच्या अडचणीच्या परिस्थितीत त्याने जबाबदारीची खेळी करत ९६ धावांची शानदार खेळी साकारली. सुरुवातीच्या षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. मात्र एका बाजूने विकेट्स पडत असतानाही वैभवने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ साधत संघाचा डाव सावरला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित षटकांत २१४ धावा उभारल्या आणि गुजरात टायटन्ससमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. शतकाच्या अवघ्या चार धावा दूर असताना त्याची खेळी संपुष्टात आली, मात्र त्याने संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या खेळीदरम्यान वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला. आयपीएल इतिहासात सर्वात वेगाने १००० धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला अनेक सामन्यांत विजय मिळवता आला असून भविष्यातील भारतीय क्रिकेटचा मोठा तारा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.







