नवी दिल्ली : अमित शाह यांनी भारताने नक्षलवादावर पूर्णपणे विजय मिळवला असून देश आता नक्षलमुक्त झाल्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि बलिदानामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. “मी आज छाती ठोकून सांगू शकतो की भारत आता नक्षलमुक्त झाला आहे,” असे ठाम विधान त्यांनी केले. बस्तर परिसरात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करून वेगाने विकास घडवून आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील पाच वर्षांत बस्तर हा देशातील सर्वाधिक विकसित आदिवासी भाग म्हणून ओळखला जाईल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. ‘बादल’ अर्थात बस्तर अकॅडमी ऑफ डान्स, आर्ट अँड लिटरेचर कॅम्पसमध्ये नागरिकांना संबोधित करताना त्यांनी १९७० च्या दशकात सुरू झालेल्या डाव्या विचारसरणीच्या उग्रवादामुळे देशातील तीन पिढ्या हिंसाचारात होरपळल्या गेल्याचे सांगितले. या हिंसाचारामुळे हजारो लोक विकास आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
अमित शाह यांनी सांगितले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले तेव्हा जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आणि डाव्या विचारसरणीचा उग्रवाद ही देशासमोरील तीन मोठी सुरक्षा आव्हाने होती. मात्र आता देशाने या तिन्ही आव्हानांवर मोठ्या प्रमाणावर मात केली आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांनी नक्षली हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची आणि नक्षलविरोधी मोहिमेत शौर्य गाजवणाऱ्या जवानांची भेट घेतली. तसेच नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात शहीद झालेल्या एक हजाराहून अधिक जवानांना ‘अमर वाटिका’ स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. मुख्य प्रवाहात परतणाऱ्या तरुणांना समाजात सन्मानाने स्थान मिळावे यासाठी समाजातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत सुमारे ३ हजार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक योजना राबविण्यात येत आहे. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ७० कॅम्प्सचे रूपांतर “जनकल्याण सेवा केंद्रांमध्ये” करण्यात येणार असून, दुर्गम भागांमध्ये रस्ते, बँका, पोस्ट ऑफिस, वीज, पिण्याचे पाणी आणि एलपीजीसारख्या मूलभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे.







