मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील ‘गरीब नगर’ झोपडपट्टीमधील अनधिकृत बांधकामांवर पश्चिम रेल्वेने मोठी कारवाई सुरू केली आहे. रेल्वेच्या मालकीच्या सुमारे ५ हजार चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आजपासून दोन दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर प्रशासनाने ४०९ पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने ‘पब्लिक प्रिमायसेस ॲक्ट १९७१’ अंतर्गत कारवाई सुरू केली होती. ही जमीन रेल्वेची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकदा अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न झाले, मात्र रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आणि राजकीय पाठबळामुळे कारवाई लांबणीवर पडली होती. रेल्वे रुळांच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील विकासकामांसाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या झोपडपट्टीमुळे परिसरात अस्वच्छता आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. घरगुती कचरा, सांडपाणी तसेच लघुउद्योगांमधील टाकाऊ वस्तू थेट रेल्वे रुळांवर टाकल्या जात असल्याने वारंवार आगीच्या घटना घडत होत्या. त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले. कारवाईची पूर्वकल्पना मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी स्वतःहून घरे रिकामी करण्यास सुरुवात केली असून, घरातील साहित्य रस्त्यावर काढून ठेवलेले दिसून आले. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह SRPF जवानांचाही बंदोबस्तात समावेश आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्यांना तीव्र विरोध दर्शविल्याचे पाहायला मिळाले.







