पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शाळांना विद्यार्थ्यांचे निकाल शाळा लॉगिनमधून पाहता येणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांसाठीही संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षांसह शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २७ मेपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, आई-वडिलांची नावे यामधील दुरुस्तीसाठीही ऑनलाइन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचाही विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
शाळांच्या माहिती प्रपत्रामधील शहरी-ग्रामीण क्षेत्र अथवा अभ्यासक्रमातील दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह विनंतीपत्र २७ मेपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक शुल्कासह वेळेत प्राप्त झालेल्या गुणपडताळणी अर्जांवर निर्णय घेऊन तो ३० दिवसांच्या आत शाळांच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येणार आहे. सर्व ऑनलाइन अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यंदा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ लाख ५७ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३४ हजार ९२० विद्यार्थी, म्हणजेच ९६.६१ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ८७ हजार ६२३ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७३ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर अंतरिम व अंतिम उत्तरसूची जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष निकालाकडे लागले होते. आता अंतरिम निकाल जाहीर झाल्याने शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती शाळांना मिळू शकणार आहे.







