मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर येथील भाषा शिकावीच लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी १५ ऑगस्टपासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल, त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “शाहरूख खान, सलमान खान किंवा अंबानी-अदानी यांनी आमच्याकडून रिक्षा-टॅक्सी परवाना घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना मराठीचे ज्ञान आवश्यक आहे,” असे सरनाईक म्हणाले. हा नियम नवीन नसून १९८९ पासून अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओ कार्यालयांमध्ये बोगस परवाने आणि कागदपत्रांच्या तक्रारी वाढल्याने या जुन्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सरनाईक यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ भाषेचा नव्हे तर संवादाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या अनेक प्रवाशांना हिंदी भाषा समजत नाही, त्यामुळे चालक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होतात. सरकारने मीरा-भाईंदर परिसरात केलेल्या सर्वेक्षणात ३५०० चालकांपैकी ५६५ चालकांना मराठी येत नसल्याचे आढळले. त्यामुळेच मराठी शिकण्यावर भर देण्यात आला आहे. चालक संघटनांनी मुदतवाढ मागितल्यामुळे सरकारने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. तसेच, मुंबई मराठी साहित्य संघाच्या मदतीने चालकांसाठी दैनंदिन संवादाची पुस्तिका तयार करण्यात आली असून, मराठी शिकण्यासाठी अर्ध्या तासाच्या वर्गासाठी चालकांना १०० रुपये मानधनही दिले जात आहे. “परवाना घेतानाच चालकांनी मराठी भाषेच्या अटी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे आता याला सक्ती म्हणता येणार नाही,” असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.







