मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागला असून, आखाती भागातील परिस्थितीमुळे भारतात एलपीजी आणि पेट्रोलियम गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी बुकिंगच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने गॅस वितरण प्रक्रियेत नवा “डीएसी (Delivery Authentication Code)” नियम लागू केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, ग्राहक गॅस सिलेंडर बुक करताच त्यांना एक विशेष डीएसी क्रमांक पाठवला जातो. हा क्रमांक सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी दाखवणे आवश्यक असते, त्यानंतरच सिलेंडर सुपूर्द केला जातो. त्यामुळे बनावट डिलिव्हरी, चुकीची नोंद किंवा इतर फसवणुकीच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. सध्या सुमारे ९२ टक्के गॅस डिलिव्हरी या पद्धतीने होत असून, काही तांत्रिक अडचणी दूर करून अलीकडेच प्रणाली अधिक सुधारण्यात आली आहे. या बदलांमुळे ग्राहकांना जलद सेवा मिळण्याबरोबरच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
DAC नंबर कसा मिळणार?
- गॅस एजन्सीच्या नंबरवरून, IVRS कॉल किंवा एसएमएसद्वारे सिलिंडर बुक करावे. अथवा वितरकाच्या अधिकृत वेबसाइटवरून एलपीजी सिलेंडर बुक करा.
- त्यानंतर डीएसी क्रमांक येण्याची प्रतीक्षा करा. तुमचे बुकिंग निश्चित झाल्यानंतर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) तयार होईल आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे पाठवला जाईल.
- हा डीएसी (DAC) कोड सुरक्षित ठेवा. हा कोड ओटीपीसारखा आहे. तो कोणाशीही शेअर करू नका. फक्त डिलिव्हरी एजंटलाच द्यावा.
- जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे सिलेंडर घेऊन येईल, त्यावेळी त्याला हा डीएसी कोड सांगा. डीएसी कोड सांगितल्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळेल.
- हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे DAC क्रमांक नसल्यास, तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळू शकणार नाही.







