पुणे : किरकोळ वादातून आतेभावाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी पहाटे घ़डली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी आतेभावाला अटक केली. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कौशल लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहन ओव्हाळच्या बहिणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ हा बेरोजगार होता. कौशल लांडगे त्याचा आतेभाऊ आहे. कौशल आणि रोहन यांच्यात भांडणे झाली होती. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील अश्विनी पॅरेडाईज सोसायटीजवळून सोमवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास रोहन निघाला होता. त्या वेळी आरोपी कौशल आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने रोहनला गाठले. त्याला शिवीगाळ करुन पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू घातला. रोहन गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या कौशलला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तपास करत आहेत.







