ठाणे : ठाणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीत लवकरच मोठा बदल पाहायला मिळणार असून, ठाणे परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर बसचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वीच या योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि त्यावेळी अर्थसंकल्पातही त्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र विविध प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. आता मात्र या प्रकल्पाला गती मिळताना दिसत असून, पुढील आठवड्यात पहिली डबल डेकर बस ठाण्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या शहरात इलेक्ट्रिक बसमुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला असताना, डबल डेकर बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि वेगळा अनुभव मिळणार आहे. सुरुवातीला या बसेसची सखोल तांत्रिक तपासणी करून ट्रायल घेतली जाणार आहे. सर्व प्रक्रिया समाधानकारक झाल्यानंतरच पुढील १५ ते २० दिवसांत सुमारे १० बसेस सेवेत दाखल केल्या जाण्याची योजना आहे. यासाठी तीन प्रमुख मार्ग निश्चित करण्यात आले असून, तीन हात नाका–घोडबंदर गायमुख, शिळफाटा दत्त मंदिर–डोंबिवली प्रवेशद्वार आणि पारसिक नगर–मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजी नगर हे मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांवर कोणताही अडथळा न येता सेवा सुरळीत चालेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्याचा विचार सुरू असून, शनिवार-रविवारी एकाच तिकीटावर तीनही मार्गांवर फिरण्याची विशेष योजना देखील राबविण्याचा प्रस्ताव आहे.







