वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून, याचे परिणाम केवळ क्षेपणास्त्रे किंवा कच्च्या तेलापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आता या युद्धाचा धोका थेट तुमच्या हातातील इंटरनेटला निर्माण झाला आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या ज्या केबल्सद्वारे जगभर इंटरनेट पुरवले जाते, त्या आता युद्धाच्या छायेखाली आहेत. या डिजिटल युद्धाचा पहिला मोठा फटका मेटा कंपनीला बसला आहे. आफ्रिका आणि आखाती देशांना जोडण्यासाठी सुरू असलेला ४५००० किलोमीटर लांबीचा ‘२-आफ्रिका’ हा जगातील सर्वात मोठा केबल प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे. ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या युद्धक्षेत्राच्या जवळ असलेल्या देशांमधून जाणारा केबलचा भाग आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठा खिळ बसला आहे.
जगातील सुमारे ९५ टक्के इंटरनेट ट्रॅफिक हे समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सवर अवलंबून असते. तुमचे ई-मेल्स, व्हिडिओ कॉल्स, ऑनलाइन बँकिंग आणि स्ट्रीमिंग सेवा या सर्व याच केबल्सद्वारे चालतात. या भागातून किमान १७ महत्त्वाच्या केबल्स जातात, ज्या युरोप, आशिया आणि आफ्रिकेला जोडतात. टाटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या कंपन्यांचे डेटा सेंटर्स जोडणाऱ्या मुख्य केबल्स याच मार्गावरून जातात. इराणने या भागात सागरी सुरुंग पेरल्याने या केबल्सना कधीही धोका पोहोचू शकते. समुद्राच्या तळाशी असलेल्या या केबल्स दिसायला मजबूत असल्या तरी त्या सुरक्षित नाहीत. विशेषतः लाल समुद्र आणि आखाती प्रदेशात पाणी कमी खोल असल्याने जहाजांचे नांगर किंवा लष्करी कारवाईमुळे या केबल्स सहज तुटू शकतात. गेल्या वर्षी एका व्यापारी जहाजाच्या नांगरामुळे अनेक केबल्स कापल्या गेल्या होत्या, ज्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमधील इंटरनेट सेवांवर झाला होता. आता सुरू असलेल्या युद्धात जर या केबल्सना लक्ष्य करण्यात आले, तर केवळ आखाती देशच नाही, तर संपूर्ण जगाचे डिजिटल व्यवहार ठप्प होऊ शकतात. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि दळणवळण यंत्रणा कोलमडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.






