पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या ६ महिन्यांत हे ऑडिट पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पळ काढल्याच्या घटना वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे.
पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ससून रुग्णालय पोलीस चौकी उभारण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार हारून खान यांनी यासंबंधी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासंबंधी नवी नियमावली करण्यात आली आहे. तसेच, सेफ्टी ऑडिटचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयांच्या रचनेत आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील, असेही कदम यांनी नमूद केले. सेफ्टी ऑडिट केवळ औपचारिकता न राहता त्यातून ठोस सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या जातील. आरोपींच्या पलायनाच्या घटना रोखणे हे उद्दिष्ट आहे, असे कदम यांनी सांगितले.







