नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होताच महागाईमुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही झटका बसला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक (हॉटेल, कॅटरिंग) एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट १११ रुपयांची वाढ केली आहे. हे नवे दर १ जानेवारी २०२६ पासून लागू झाले आहेत. मात्र घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशातील इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ५ रुपये आणि ऑक्टोबरमध्ये १५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये हा सिलेंडर ८५३ रुपये, कोलकात्यात ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये दराने मिळत आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल एप्रिल २०२५ मध्ये करण्यात आला होता.







